प्रतिनिधी - शंकर गायकवाड
शहापूर : तालुक्यातील हॉटेल व्यवसायिकांना व्यावसायिक गॅसपुरवठा नियमित व सुरळीत करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हॉटेल चालक मालक संघटनेच्या वतीने शहापूर तहसीलदार मा. परमेश्वर कासोळे साहेब तसेच पुरवठा अधिकारी मा. डॉ. अमृता सूर्यवंशी मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक हॉटेल्ससमोर कामकाज सुरळीत चालविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गॅसचा पुरवठा वेळेवर न झाल्याने हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असून, याचा थेट परिणाम कामगारांच्या रोजगारावर आणि ग्राहक सेवांवर होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
निवेदनात असेही सांगण्यात आले की, हॉटेल व्यवसाय हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. गॅसपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे व्यवसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून, अनेकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅसपुरवठा नियमित करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून हॉटेल व्यावसायिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून द्यावा, अशीही विनंती करण्यात आली. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.
या वेळी हॉटेल चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय देशमुख, सचिव उत्तम शेट्टी, उपाध्यक्ष संजय म्हसकर, अजित(आप्पा )आळशी तसेच प्रविण खारीक आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने प्रशासनाकडे ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली.
शेवटी, प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


Post a Comment
0 Comments