धाराशिव, प्रतिनिधी- शंकर गायकवाड : शहरातील शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढविण्यात येणार आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून धाराशिव शहरात महिलांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरातील टवाळखोरांवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग (ट्युशन क्लासेस) तसेच बसस्थानक परिसरात मुलींना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘निर्भय’ आणि ‘पिंक’ पथकाची वर्दळीच्या ठिकाणी गस्त वाढविणे, महिलांच्या तक्रारींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करणे तसेच महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सक्रिय भूमिका घ्यावी, अशा मागण्या नगराध्यक्षा काकडे यांनी मांडल्या.
पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी महिला सुरक्षा हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत, शहरातील असुरक्षित ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी गस्त आणि पोलीस बंदोबस्त अधिक प्रभावी करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहर महिला व मुलींसाठी अधिक सुरक्षित, निर्भय आणि विश्वासार्ह बनविणे हाच मुख्य उद्देश असल्याचे नगराध्यक्षा नेहा काकडे यांनी नमूद केले.
या बैठकीस कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे तसेच धाराशिव नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती वैशालीताई सुशांत सोनवणे यांचीही उपस्थिती होती.
महिला सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या या पावलांमुळे शहरात प्रभावी उपाययोजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments