प्रतिनिधी - शंकर गायकवाड
येरवडा, पुणे (प्रतिनिधी): येरवडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महिलांच्या हक्क व अधिकारांवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन आयुक्त, समाज कल्याण पुणे मा. दीपा मुधोळ मुंडे (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना दीपा मुधोळ मुंडे यांनी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. दुर्बल घटकांतील तसेच मागासवर्गीय समाजातील महिलांना भेडसावणाऱ्या अडचणींवर समन्वयाने मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
राज्यातील ८८९ खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी देण्याबाबत शासनाने नोव्हेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांचा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या सामाजिक संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत विधवा, परित्यक्ता तसेच पारलिंगी समुदायाला शासनाकडून प्राधान्य दिले जात असल्याची माहिती देण्यात आली. दिवसभर विविध तज्ञ वक्त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी दिल्लीहून केंद्रीय समन्वयक देबजानी शाहू यांनी प्रास्ताविक केले. बार्टीचे प्रकल्प संचालक सहारे सर यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी ज्येष्ठ नेते शिवराम दादा कांबळे, पंचशीलाताई कुंभारकर, ॲड. विशाल साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेमुळे महिलांमध्ये हक्क व अधिकारांविषयी जागरूकता निर्माण होऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments