वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे विविध संघटनांच्या वतीने “मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलन” तसेच “मोदी हटाव, देश बचाव” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी, सीपीआय आणि इतर घटक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली.
युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, जगभरात ज्या लोकांची नावे कथित “एपस्टिन फाईल्स”मध्ये आली आहेत, त्यांनी राजीनामे दिले; मात्र भारतातील संबंधितांबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देऊन पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. देशातील लाखो मुली बेपत्ता असल्याचा मुद्दा उपस्थित करत याबाबत उत्तरदायित्व निश्चित करावे, असेही ते म्हणाले.
कामगार नेते मिलिंद रानडे (सीपीआय) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच उद्योगपतींवरील परदेशातील प्रकरणे आणि परराष्ट्र धोरणाबाबत केंद्र सरकारवर आरोप करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होत असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी देशाच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करत, कथित “एपस्टिन फाईल्स” संदर्भात पंतप्रधानांनी देशासमोर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. देशातील मोठे उद्योगसमूह आणि केंद्र सरकार यांच्यातील संबंधांवरही त्यांनी टीका केली.
मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी (वंचित बहुजन महिला आघाडी) यांनी देशातील बेपत्ता मुलींचा मुद्दा मांडत, या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. संबंधित प्रकरणांबाबत सखोल चौकशीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली. आंदोलकांनी परराष्ट्र धोरण, व्यापार करार आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, या सर्व आरोपांबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.




Post a Comment
0 Comments