कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरगुती एलपीजी गॅसची टंचाई तीव्र झाली असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि सणांच्या तयारीवर होत आहे. विशेषतः गुढीपाडवा आणि ईद या महत्त्वाच्या सणांच्या अगोदरच गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये गॅस एजन्सीकडे सिलिंडर उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी बुकिंग केल्यानंतरही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि लहान खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसत असून त्यांच्या व्यवसायावर परिणाम दिसून येत आहे.
दरम्यान, जोगेश्वरी, रांजणगाव, विटावा, वाळूज, पंढरपूर आदी परिसरांमध्ये गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना उन्हातान्हात लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक ग्राहकांनी सांगितले की, गॅस मिळवण्यासाठी त्यांना कंपनीतील कामावरून सुट्टी घ्यावी लागत आहे, तरीही वेळेवर सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
गॅस पुरवठ्यातील अडथळ्यांमागे वितरण यंत्रणेतील तांत्रिक अडचणी, वाहतूक विलंब आणि सणासुदीमुळे वाढलेली मागणी ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा अपुरा पडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून गॅसचा नियमित आणि सुरळीत पुरवठा करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Post a Comment
0 Comments