पुणे (प्रतिनिधी – तेजस घोसाळे): जागतिक महिला दिनानिमित्त दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) महिला विंग महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे स्टेशन येथील पंचरत्न सभागृहात “स्पेशल व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम” या विशेष महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात संगमनेर येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत शिंदे यांच्या सुविद्य पत्नी कल्पना शिंदे यांच्यासह डॉ. पल्लवी साठे, कोमल साबळे, प्रीती ससाणे, ज्योत्स्ना खंडारे, कोमल ननवरे, उज्वला घाडगे, राजश्री पेठवाडकर आणि रोहिणी साठे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डिक्कीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देशाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असून काळाची गरज ओळखून देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महिला उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अर्चना सिंह, सीमा कांबळे आणि निवेदिता कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, उद्योजकता आणि आर्थिक स्वावलंबन यावर विशेष भर देण्यात आला.


Post a Comment
0 Comments