प्रतिनिधी - शंकर गायकवाड
कर्जत : मौजे भांबोरा येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत वाहक तारा शेतजमिनीवरून नेण्याच्या विरोधात मागासवर्गीय शेतकरी दिलीप हिरभगत यांनी कर्जत उपविभागीय प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली सुरू असलेले हे आंदोलन सलग दोन दिवस चालले. अखेर कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
भांबोरा येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत वाहक तारा शेतजमिनीवरून नेल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या तारांमुळे शेतातील मशागत, ट्रॅक्टरसारखी यंत्रसामग्री वापरणे तसेच दैनंदिन शेतीकामात अडथळे निर्माण होतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात शेतकऱ्यांच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या विद्युत वाहक तारा अंडरग्राउंड पद्धतीने टाकाव्यात, अशी मागणी शेतकरी दिलीप हिरभगत यांनी केली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते ॲड. डॉ. अरुणआबा जाधव यांनी प्रशासनाला निवेदन देत शेतकऱ्यांची बाजू मांडली. “गरीब शेतकरी आधीच कर्जबाजारी आहे. अवकाळी पावसामुळे ओल्या दुष्काळाचा फटका बसला असून आर्थिक संकटात तो सापडला आहे. अशा परिस्थितीत सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांवर आणखी संकट येऊ नये. या तारांमुळे शेतकऱ्यांसह शाळेत ये-जा करणाऱ्या मुलांनाही धोका संभवतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आंदोलन सुरू होते. यावेळी वंचित बहुजन युवाआघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ता भालेराव, जिल्हा ज्येष्ठ सल्लागार आप्पा सरोदे, जिल्हा महासचिव संजय शेलार, तुकाराम पवार, कर्जत शहराध्यक्ष विकास समुद्र, चंद्रकांत डोलारे, मंगेश हिरभगत, राहुल अडसूळ, सुरज सातव, दिक्षेण पवार, काजुरी पवार, धनंजय काळे, पूनम काळे, विजय शिंदे, एमआयएम तालुका अध्यक्ष डॉ. अन्सार शेख, पोपट फुले, संभाजी मंडलिक, रामकृष्ण नेटके, देविदास सरोदे, अमोल चव्हाण, बापू काकडे, हरिण पोटरे, तकदीर काळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर दिलीप हिरभगत यांनी सुरू केलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.


Post a Comment
0 Comments