प्रतिनिधी -शंकर गायकवाड
नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. 23 मार्च 2026) नागपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
मोर्चादरम्यान आंदोलकांनी हातात घेतलेल्या फलकांमधून केंद्र सरकार आणि RSSवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. “RSS मुर्दाबाद”, “गली-गली में शोर है, सत्ता का असली मालिक कोई और है”, “पग घुंगरू बांध मोदी नाचा रे”, “मोदी का दिल भारत के लिए नहीं, अमेरिका के लिए धड़कता है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही फलकांवर पंतप्रधानांच्या प्रतिमेसह निषेधाचे चिन्हही दर्शविण्यात आले होते.
तसेच “ब्लॅकमेल की सरकार” आणि “अमेरिका के इशारों पर नाचती सरकार” अशा संदेशांद्वारे केंद्र सरकारवर परराष्ट्र धोरण आणि निर्णय प्रक्रियेवर टीका करण्यात आली. या फलकांमधून आंदोलनकर्त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांचा सहभाग होता. सर्व आंदोलक शांततेत बसून निषेध नोंदवत होते, मात्र घोषणाबाजीमुळे वातावरण तापले होते.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था केली होती. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले होते.
वंचित बहुजन आघाडीने या आंदोलनातून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि RSSच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भविष्यातही अशा आंदोलनांना अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.


Post a Comment
0 Comments