Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

नागपुरात आरएसएस मुख्यालयावर ‘विशाल जनआक्रोश संयुक्त मोर्चा’; केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका

 


कार्यकारी संपादक : रितेश साबळे

नागपूर : वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष तसेच इतर समविचारी संघटनांच्या वतीने नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर “विशाल जनआक्रोश संयुक्त मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


मोर्चादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव तथाकथित ‘एपस्टीन फाईल’मध्ये आल्याचा आरोप करत, अमेरिकेसोबत केलेल्या व्यापार करारांमुळे देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या करारांमुळे शेतकरी, भारतीय उत्पादने, कामगार आणि देशाच्या आर्थिक स्वायत्ततेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला.


यावेळी उपस्थित नेत्यांनी ही लढाई केवळ शहरापुरती मर्यादित न ठेवता तालुका व जिल्हास्तरावर नेण्याचे आवाहन केले. जनजागृती करून व्यापक लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मोर्चादरम्यान आरएसएसच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. “आरएसएसनेच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवले असून, जर ते ब्लॅकमेल होऊन देशविरोधी निर्णय घेत असतील, तर स्वतःला देशभक्त म्हणवणारा आरएसएस गप्प का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच, मोदी यांना पंतप्रधानपदी कायम का ठेवले आहे, याचे स्पष्टीकरण आरएसएसने द्यावे, अशी मागणी करण्यात आली.


दरम्यान, मोर्चेकऱ्यांनी आरएसएस मुख्यालयाकडे शांततेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिस प्रशासनाने त्यांना मध्यरस्त्यातच अडवले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments