Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कल्याण तालुक्यात सोसायटी बैठकीत वाद; महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

 


प्रतिनिधी -मनोहर गायकवाड 

📍 कल्याण (ठाणे ग्रामीण) | दि. 6 एप्रिल

कल्याण तालुक्यातील म्हारळ येथील विठ्ठल कृपा सोसायटीमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिला व तिच्या पतीविरोधात पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8.30 ते 9 वाजण्याच्या दरम्यान सोसायटीमध्ये नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोसायटीतील अनेक सदस्य उपस्थित होते.

बैठक सुरू असताना सोसायटीचे मेंटेनन्स व पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. या वादाच्या दरम्यान आरोपी धर्मेंद्र उर्फ राहुल उपाध्याय व त्यांची पत्नी प्रियंका धर्मेंद्र उपाध्याय यांनी तक्रारदार प्रमिला सुनील शिंदे यांना तसेच बौद्ध समाजातील इतर सदस्यांना लक्ष्य करत सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार प्रमिला शिंदे यांनी जातीवाचक वक्तव्यांवर आक्षेप घेतल्यावर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोसायटी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच म्हारळ गावातील स्थानिक संघटना बौद्ध धम्म दीप सेवा संघटनाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील मोठ्या संख्येने भीमसैनिक घटनास्थळी जमा झाले. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना टिटवाळा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले.

त्यानंतर पीडित महिला व स्थानिक कार्यकर्त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत रात्री सुमारे 3 वाजता अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita) 2023 अंतर्गत कलम 352, 351(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1)(r) व 3(1)(s) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच संबंधित आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून समाजात पुन्हा एकदा जातीवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलिसांना इशारा देण्यात आला असून 14 एप्रिलपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास टिटवाळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments