Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

अल्टिमेटम! १३ एप्रिलपर्यंत पुतळा हटवा, अन्यथा १४ एप्रिलला जनआंदोलन; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

प्रतिनिधी - मनोहर गायकवाड 

उल्हासनगर-३ येथील शांतीनगर स्मशानभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बेकायदेशीररित्या उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या प्रकरणी संबंधित पुतळ्याचे तात्काळ स्थलांतर करण्यात यावे, अशी ठाम मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.


संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, १३ एप्रिल २०२६ पर्यंत पुतळा हलवण्यात यावा, अन्यथा १४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्यात येईल. तसेच या आंदोलनाद्वारे पुतळा सन्मानपूर्वक योग्य ठिकाणी स्थलांतरित केला जाईल, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.


वंचित बहुजन आघाडीने हा केवळ मागणीचा विषय नसून हक्काचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे अधोरेखित केले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.


दरम्यान, हा पुतळा नेमका कोणी आणि कशा परवानगीने बसवला, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेकडे चौकशी केली असता, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.


या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली, तरी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Post a Comment

0 Comments