Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

प्रा. दामोदर मोरे हे राष्ट्रीय मान्यता मिळालेले कवी – डॉ. श्रीपाल सबनीस


कल्याण : ज्यांच्या विद्वत्तेची ख्याती महाराष्ट्राबाहेर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे, असे प्रा. दामोदर मोरे आज वसंत मून पुरस्कार मिळालेल्या डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. यशवंत मनोहर, वामन होवाळ आणि कुमुद पावडे यांच्या परंपरेत जाऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करताना मला आनंद होत आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक चौकटी ओलांडून प्रा. मोरे यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. देशातील शंभर विद्वानांनी त्यांच्या कवितेवर लेख लिहिले आहेत. त्यांची कविता पूर्णपणे आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित आहे. त्यांच्या कवितेचा गौरव म्हणजे आंबेडकरवादाचा, मानवतेचा आणि समतेचा गौरव आहे. त्यामुळे दामोदर मोरे हे राष्ट्रीय मान्यता प्राप्त कवी आहेत. म्हणूनच या प्रतिष्ठानला त्यांचा सन्मान करताना अभिमान वाटत आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.


उल्हासनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वसंत मून सोशल वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते.


डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य केवळ दलित समाजापुरते मर्यादित नव्हते, तर ते व्यापक स्वरूपाचे होते. ज्ञान ही विश्वात्मक संकल्पना आहे आणि ज्ञानाच्या व्यापक संदर्भात वसंत मून यांच्या कार्याचा परिप्रेक्ष्य विश्वापर्यंत विस्तारतो.


सत्कारमूर्ती प्रा. दामोदर मोरे यांनी आपल्या भाषणात वसंत मून यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी सांगितल्या. यावेळी पद्मश्री कल्पना सरोज, डॉ. प्रकाश वाकोडे, महेश भारतीय आणि किरण सोनवणे यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रमुख पाहुण्या उद्योजक पद्मश्री कल्पना सरोज, फाउंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका अंजली साळवे आणि डॉ. चंद्रकांत साळवे यांच्या हस्ते प्रा. दामोदर मोरे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा पाचवा वसंत मून पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि एकवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. सिंधू रामटेके यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.


यावेळी डॉ. जलदा ढोके-गाणार लिखित ‘वसंत मून (मराठी साहित्य आणि विचार विश्व)’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल केदारे यांनी केले.


या पुरस्कार सोहळ्याचे देखणे संयोजन फाउंडेशनचे संचालक रोहित साळवे यांनी केले. कार्यक्रमास मिलिंद मून, आय. एम. मोरे, जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे, साहित्यिक शिवा इंगोले, शुक्राचार्य गायकवाड, आशालता कांबळे, दिलीप मालवणकर, डॉ. मंगेश बनसोड, प्रशांत धांडे, संजय अभंग, अनुराधा वानखडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


उज्वला मिलिंद मून यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Post a Comment

0 Comments