प्रतिनिधी - शंकर गायकवाड
शहापूर (ठाणे) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), महाराष्ट्र कृषी विभाग आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हवामानपूरक डिजिटल शेतीशाळा’ उपक्रमांतर्गत शहापूर तालुक्यातील मुगाव येथे दुसऱ्या सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शेतीशाळेत आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नैसर्गिक शेती पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दर बुधवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या शेतीशाळेत यावेळी ‘पेरणीपूर्व तयारी’ या महत्त्वाच्या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती माहेश्वरी महादेव भोसले यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना तांत्रिक माहिती दिली. यामध्ये नैसर्गिक निविष्ठांचा वापर, बीजप्रक्रिया तसेच बीजामृत आणि जीवामृत यांसारख्या नैसर्गिक खतांची निर्मिती कशी करावी याचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या डिजिटल शेतीशाळेस मुगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तसेच गावातील प्रयोगशील शेतकरी बांधव आणि महिला मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या. शासनाच्या या उपक्रमामुळे घरच्या घरी कमी खर्चात शेतीसाठी आवश्यक निविष्ठा तयार करण्याचे तंत्र शेतकऱ्यांना शिकता आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती आणि स्थिर उत्पन्नासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे, असे मत यावेळी कृषी विभागामार्फत व्यक्त करण्यात आले.


Post a Comment
0 Comments