वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शहापूर : अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिगाव येथील खेळाडूंनी आपल्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. छत्तीसगड येथे पार पडलेल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स स्पर्धेत मल्लखांब या खेळासाठी महाराष्ट्र राज्याकडून कु. देविदास कामडी, कु. सचिन वारे आणि कुमारी पूजा पुंजारी यांची निवड झाली होती.
या निवडीचे चीज करत शहापूर तालुका, ठाणे जिल्ह्यातील या तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक, रजत पदक आणि कांस्य पदक पटकावून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण शहापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी आमदार तथा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. दौलतजी दरोडा यांनी या खेळाडूंना आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले होते. स्पर्धेतून विजयी होऊन परतल्यानंतर या खेळाडूंनी आमदार दरोडा यांची भेट घेऊन आपली पदके दाखवली.
यावेळी आमदार दरोडा यांच्या वतीने खेळाडूंचा शाल व पदक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामुळे दुर्गम भागातील खेळाडूंमध्ये नव्या उत्साहाची आणि प्रेरणेची भावना निर्माण झाली आहे.


Post a Comment
0 Comments