प्रतिनिधी : तेजस घोसाळे
अहिल्यानगर :- महिला ब्युटी क्षेत्रातील कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय वृद्धीला चालना देण्याच्या उद्देशाने तेजस सेवा प्रतिष्ठान संचलित महिला ब्युटी असोसिएशन (MBA) यांच्या वतीने अहिल्यानगर येथील हॉटेल यश पॅलेस येथे भव्य इंटरनॅशनल ब्युटी सेमिनार आणि बेस्ट मेकअप अवॉर्ड २०२६ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविंद्र घोसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सेमिनारमध्ये जपानचे सुप्रसिद्ध स्किन एक्स्पर्ट रोयाटा तानीगुची, पुण्याचे स्किन एक्स्पर्ट रुपेश सर, मेकअप आर्टिस्ट शंतनु सर तसेच स्किन एक्स्पर्ट लीना खांडेकर यांनी उपस्थित महिला ब्युटिशियन्सना आधुनिक स्किन केअर, मेकअप तंत्रज्ञान, नवीन ट्रेंड्स आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्युटी तंत्रांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जपानी तज्ज्ञांचे ज्ञान मराठी भाषेत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आल्याने उपस्थितांनी या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी ऑनलाईन व्यवसाय वृद्धी आणि डिजिटल मार्केटिंगच्या वाढत्या गरजेवरही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. 'सखी पे' ॲपचे प्रमुख प्रशांत वाडेकर यांनी ब्युटिशियन्सनी आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ६० हून अधिक महिला ब्युटिशियन्सना 'बेस्ट मेकअप अवॉर्ड २०२६' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये वर्षा शहाणे, उर्मिला ढोले, प्राची जाधव, रोहिणी वाघमारे, प्रियांका अहिरे, मनीषा त्र्यंबके, सुनिता नागरे, ऐश्वर्या मुळे, प्रीती देशमुख, सोनाली भुजबळ, वर्षा सूर्यवंशी, प्रियांका वाघमारे, अनिता वेळेकर, प्राजक्ता काळे, क्रिष्णा शर्मा, अफसाना खान, सुरेखा बढे, ज्योती पाखरे आदींचा समावेश होता.
सेमिनार यशस्वी करण्यासाठी प्रतिभा शर्मा, रोहिणी करंजकर, माया टोणपे, सविता शिंदे, आरती गोरखा, ज्योती जाधव आणि प्रज्ञा कंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर आणि संभाजीनगर जिल्ह्यांतील महिला ब्युटिशियन्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बिझनेस कोच कमलेश कोते यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आणि महिला उद्योजिकांना व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन अशा विविध पैलूंनी समृद्ध ठरलेला हा सेमिनार महिला ब्युटी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.


Post a Comment
0 Comments