कल्याण | प्रतिनिधी :-आनंदा भालेराव
कल्याण, दि. १ ऑगस्ट: ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन, मुंबई मंडळाची डिव्हिजनल कौन्सिल (DCM) बैठक शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एनआरएमयू कल्याण मेन शाखा कार्यालयात मुंबई मंडळाचे अध्यक्ष कॉ. जे. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी मुंबई मंडळाचे सचिव कॉ. आनंदा धोंडीबा भालेराव यांच्या नात जान्हवी अविनाश भालेराव हिच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करून तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बैठकीच्या कामकाजास सुरुवात झाली.
बैठकीत सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये फॅमिली पास, फॅमिली पेन्शन, रेल्वे आरोग्य सेवा, आठवा वेतन आयोग, सभासद संख्या वाढविणे तसेच इतर महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.
मुंबई मंडळाचे सचिव कॉ. आनंदा धोंडीबा भालेराव यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा सादर करत विविध विषयांवर केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. मुख्यालयाचे खजिनदार कॉ. भोसले तसेच महामंत्री कॉ. व्ही. आनंदन यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष कॉ. जे. एन. पाटील यांनी आपल्या समारोपपर भाषणात उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शनानंतर बैठक समाप्त झाली.
बैठकीनंतर "कॉ. वेणू पी. नायर महामंत्री (मध्य रेल्वे-कोकण रेल्वे) जिंदाबाद", "एनआरएमयू जिंदाबाद" आणि "ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या बैठकीस मुंबई मंडळातील पदाधिकाऱ्यांसह कसारा शाखा, इगतपुरी शाखा आणि कल्याण मेन शाखेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments