Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी, जिथे समस्या तिथे वंचित आघाडी आपल्या सोबत : राजेंद्र पातोडे. वेरूळ येथे विश्वकर्मा प्रकट दिन व समाज मेळावा उत्साहात संपन्न.

सहसंपादक - शंकर गायकवाड 

वेरूळ : सुतार, लोहार, शिल्पकार, सोनार, तांबट आदी विश्वकर्मा वंशीय समाजातील घटकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समाजकारणासोबतच राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे. समाजबांधवांवर ज्या ठिकाणी संकट येईल, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत ठामपणे उभी राहील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केले.


विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र वेरूळ येथील श्री विश्वकर्मा मंदिराच्या प्रांगणात विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पातोडे बोलत होते.


कार्यक्रमास श्री विश्वकर्मा मंदिराचे पुजारी महिंद्र बापूजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ, युवा नेते अमित भुईगळ, राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव, उद्योजक पराग अहिरे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन सुतार, कार्याध्यक्ष अरुण भालेकर, सरचिटणीस संजय सुतार, राज्य उपाध्यक्ष गोपाल राऊत, महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष शुभदा ताई धामापूरकर, उपाध्यक्ष धनराज वेलणकर, राजेश नागपुरे, राज्य संघटक राजकुमार राऊत, सचिव विलास पवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे अल्ताफ शेख, जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्राचे अजित मुंडे तसेच वेरूळ शाखेचे व्यवस्थापक सौरव कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी प्रा. नागोराव पांचाळ म्हणाले की, विश्वकर्मा वंशीय समाजाच्या अधिवेशनाला यंदा १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत समाजामध्ये जनजागृती करण्यासोबतच समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आगामी काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


समाजातील युवकांनी उद्योजकतेकडे वळावे, कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घ्यावे तसेच एआय तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आत्मसात करावेत. ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेम डेव्हलपमेंट यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही तरुणांनी संधी शोधावी. व्यवसायाच्या वाढीसाठी मार्केटिंग आणि पॅकेजिंगसारख्या बाबींनाही महत्त्व दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.


समाजरत्न पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान


मेळाव्यात प्राथमिक शिक्षक भाऊसाहेब राऊत, युवा उद्योजक पवन शेटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण लाटेकर, पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते विष्णू गरुड आणि साहित्यिक चंद्रकांत पोतदार यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


यावेळी ह. भ. प. पद्मावती सुतार लिखित ‘विराट स्वरूप श्री विश्वकर्मा’ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी नऊ वाजता प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी दहा वाजता प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्याध्यक्ष अरुण भालेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शुभदा धामापूरकर, भगवान शिंदे व प्रसाद गडकर यांनी पुरस्कारार्थींच्या सन्मानपत्राचे वाचन केले.


विलास पवार व संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले. सचिन सुतार यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली, तर राजकुमार राऊत यांनी आभार मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल डोळस, किशोर शिरसाठ, परमेश्वर पांचाळ, सोमनाथ राऊत आदींनी परिश्रम घेतले. पुणे, लातूर, बीड, अहिल्यानगर, अमरावती, नांदेड, कोकण, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments