अंबरनाथ |प्रतिनिधी - आनंदा भालेराव
अंबरनाथ पूर्व येथील शिवगंगानगर, शिवमंदिराजवळील बुद्ध विहार येथे कष्टकारी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य व संघमित्र बहुउद्देशीय सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस अंबरनाथ शहरालगतच्या खेड्यापाड्यांतील कष्टकरी, आदिवासी तसेच वंचित घटकांतील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. प्रारंभी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी प्रास्ताविक करत संघटनेची भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संघटनेची ताकद वाढविणे, कष्टकरी व वंचित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविणे, घरकुल योजना तसेच इतर मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी राम तांबे (महाराष्ट्र संघटक), गुलशन वाघे (ठाणे/रायगड जिल्हाध्यक्ष), बंधु नागवंशी (अंबरनाथ शहराध्यक्ष) यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान अंबरनाथ शहराची कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये सौ. पद्माबाई मुरलीधर इंगळे – अध्यक्षा, अंबरनाथ शहर, सौ. हेमलता सुनील रोकडे – महासचिव, ॲड. अनिल भास्कर काळे – कार्याध्यक्ष, सौ. कविता गौतम किर्तने – खजिनदार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संविधानिक, न्यायिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून वंचित घटकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना अध्यक्ष शशिकांत भालेराव यांनी दिल्या.
अध्यक्षांच्या परवानगीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर बैठकीची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments