दिवा | प्रतिनिधी- आनंदा भालेराव
दिवा परिसरातील बेतवडे गावात गणेशोत्सवाच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून अनोखा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजसेवक तथा कामगार नेते कॉ. जगन्नाथ नाना पाटील (जे. एन. पाटील) यांनी या उपक्रमाची सुरुवात केली असून, आजही ही सामाजिक परंपरा सातत्याने सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी हार-फुले, अगरबत्ती, मिठाई, फळे किंवा अन्य पूजेचे साहित्य न आणता त्याऐवजी पेन, वह्या, पुस्तके, पेन्सिल, कंपास बॉक्स तसेच विद्यार्थ्यांच्या उपयोगी शैक्षणिक साहित्य आणावे, असे आवाहन करण्यात येते.
या आवाहनाला नातेवाईक, मित्रमंडळी आणि भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य जमा होते. गणेश विसर्जनानंतर हे साहित्य आसपासच्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाटप केले जाते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याबरोबरच ‘उत्सवातून सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाला प्रोत्साहन’ असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
दरम्यान, ऑल इंडिया रेल्वे पेन्शनर वेल्फेअर फेडरेशन, मुंबई मंडळाचे अध्यक्ष कॉ. जे. एन. पाटील यांच्या निवासस्थानी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉ. वेणु पी. नायर यांनी गणेश दर्शन घेतले. यावेळी सामाजिक उपक्रमाबाबतही चर्चा झाली.


Post a Comment
0 Comments