सहसंपादक - शंकर गायकवाड
नांदेड : निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने वंचित बहुजन आघाडीचे मनपातील गटनेते प्रशांत इंगोले यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील दोन ऐतिहासिक चौकांना बहुजन महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्यांमुळे नवी ओळख मिळावी, यासाठी त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे.
शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौकात शिवरत्न जिवाजी महाले यांचा, तर नमस्कार चौकात वस्ताद लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी प्रशांत इंगोले यांनी केली आहे.
या मागणीपुरते मर्यादित न राहता इंगोले यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकृत ठराव घेण्यासाठी रीतसर प्रस्तावही दाखल केला आहे. त्यामुळे या मागणीला आता प्रशासकीय प्रक्रियेची जोड मिळाली आहे.
“बहुजन महापुरुषांचा गौरवशाली इतिहास जपणे ही काळाची गरज आहे. त्यांचे पुतळे हे केवळ स्मारक नसून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील,” असे मत प्रशांत इंगोले यांनी व्यक्त केले.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा शिवरत्न जिवाजी महाले स्मारक समितीचे अध्यक्ष अॅड. गोविंद दळवी, वंचितचे नेते श्याम कांबळे, काँग्रेसचे मनपातील नेते अब्दुल गफ्फार, नगरसेवक मुन्ना अब्बास, नगरसेवक सत्यपाल सावंत, तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी गंगाधर जाकरे, अॅड. संतोष गंगातीर, मदन वाघमारे, संजय मोगरपल्ली, अॅड. संदीप साखरे, अशोक खोडके, राजू भालेराव यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments