Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वंचित बहुजन आघाडी, कॉंग्रेस व इतर पक्षांच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या सोबतीने, शिवरत्न जिवाजी महाले स्मारक समितीच्या वतीने महापौर आणि आयुक्तांना निवेदन; पुतळ्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याची मागणी.


सहसंपादक - शंकर गायकवाड 

नांदेड, दि. १५ - छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून स्वराज्याचे रक्षण करणारे शूर मावळे शिवरत्न जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौकात उभारण्यात यावा, अशी मागणी शिवरत्न जिवाजी महाले स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त यांना देण्यात आले आहे.


या निवेदनात समितीने म्हटले आहे की, अखिल भारतीय जीवा सेनेच्या वतीने सन २०१० मध्ये जिवाजी महाले यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने दि. २२ ऑगस्ट २०१२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ७१ अन्वये गोवर्धनघाट पूल ते लातूर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओम गार्डन व नागार्जुना इंग्लिश स्कूल समोरील चौकास "शिवरत्न जिवाजी महाले चौक" असे नामकरण करण्यास मान्यता दिली होती.


त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने दि. २७ जून २०१४ रोजी तत्कालीन महापौर, आयुक्त आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सदर चौकाच्या नामकरण फलकाचे अधिकृत अनावरण करण्यात आले होते. याची अधिकृत निमंत्रण पत्रिकाही महापालिकेने प्रसिद्ध केली होती.


नामकरणाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता त्याच चौकात पूर्णाकृती पुतळा उभारणे हा त्याचाच पुढील सन्मानजनक टप्पा ठरेल, अशी भूमिका स्मारक समितीने मांडली आहे.

जागेची पाहणी आणि हस्तांतरणाची मागणी

प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार शिवरत्न जिवाजी महाले चौकाच्या नैऋत्य दिशेला असलेली मोकळी जागा पुतळा उभारणीसाठी अत्यंत योग्य व पुरेशी असून, सध्या सदर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे.


या पार्श्वभूमीवर समितीने तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत -


१. चौकाच्या नैऋत्य दिशेकडील जागेची महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करावी.

२. सदर जागा पुतळ्यासाठी महानगरपालिकेस हस्तांतरित करून घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी तातडीने पत्रव्यवहार करावा.

३. पुतळा उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी, वाहतूक व सुरक्षिततेचे निकष, स्थापत्य आराखडा, अंदाजपत्रक आणि आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर मंजुरीबाबत तातडीने कार्यवाही सुरू करावी.


छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या या शूर मावळ्याचा यथोचित सन्मान व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास समितीचे अध्यक्ष गोविंद दळवी यांनी व्यक्त केला आहे. या निवेदनासोबत २०१२ चा ठराव आणि २०१४ च्या अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या छायांकित प्रती जोडण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा शिवरत्न जिवाजी महाले स्मारक समितीचे अध्यक्ष,एड गोविंद दळवी, वंचित बहुजन आघाडीचे नेते शिवा नरंगले, वंचित बहुजन आघाडीचे नेते श्याम कांबळे, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे गटनेते इंजि. प्रशांत इंगोले, महानगर अध्यक्ष काँग्रेस व नगरसेवक अब्दुल गफार, नगरसेवक राहुल सोनसळे,नगरसेवक एड. शेख बिलाल, नगरसेवक मुन्ना अब्बास, नगरसेवक प्रतिनिधी आकाश जोंधळे, नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे, नगरसेवक प्रतिनिधी सय्यद रिजवान जब्बु,रामदास जिरोणकर, प्रा.डाॅ. गणेश लिंगमपल्ले, दत्ता चापलकर, आर.जी. जाधव लक्ष्मण लिंगापुरे, सतीशचंद्र शिंदे ,गंगाधर जाकारे राजू भालेराव, आनंद भालेराव, संतोष गंगातीर, अशोक खोडके, मदन वाघमारे, श्याम जाधव, बाळू पवार. दत्तात्रय आदीमाने, साहेबराव गंगात्रे, चंद्रकांत श्रीमंगले, पुंडलिक गंगात्रे माधव सजने, मारुती श्रीमंगले, पळशीकर, ज्ञानेश्वर श्रीमंगले, राजू श्रीमंगले, रमेश मांदळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments