कल्याण : अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या १० ऑक्टोबर २०२६ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाचे नेतृत्व सरसेनानी आनंदराज आंबेडकर करणार असल्याची माहिती देण्यात आली. महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी रविवार, २० सप्टेंबर रोजी कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कल्याण येथे आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी चर्मकार समाज संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भाऊ क्षिरसागर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पॅन्थर आनंद नवसागरे यांनी केले.
यावेळी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा ठाणे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष समाजरत्न पंढरीनाथ गायकवाड यांनी महामोर्चाची रूपरेषा आणि नियोजनाची माहिती दिली. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन महामोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंढरीनाथ गायकवाड म्हणाले, “या महामोर्चातून संपूर्ण महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे की भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ठाणे जिल्हा कुठेही कमी पडणार नाही.” तसेच उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजात सुरू असलेल्या मतभेदांवर त्यांनी टीका केली. विविध नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी व्हावेत आणि महामोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीत अण्णा रोकडे, जगन्नाथ बावा, दादाभाऊ अभंग, सुखदेव उबाळे, भीमराव डोळस, आबासाहेब चासकर, अलकाताई जगताप, विनायक कांबळे, बाळू ओव्हाळ, विमलताई शरणागत, छायाताई बचुटे आणि प्रबुद्ध गायकवाड यांनी महामोर्चा मोठ्या संख्येने यशस्वी करण्याबाबत आपले विचार मांडले.
यावेळी प्रविण मिर्के, ॲड. महेंद्र निकम, सुवर्णा शिरसाठ यांच्यासह विविध समाज संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी दामू काऊतकर आणि सुंदर काऊतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment
0 Comments