कसारा | प्रतिनिधी- आनंदा भालेराव
ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन, मुंबई मंडळाच्या कसारा शाखेच्या वतीने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जीवन प्रमाणपत्र शिबिराचा समारोप शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कसारा रेल्वे स्थानक येथे करण्यात आला.
मध्य रेल्वे, मुंबई मंडळ आणि ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच कॉ. वेणु पी. नायर, महामंत्री (मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराच्या माध्यमातून कल्याण, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी आणि कसारा या विभागांतील सुमारे १०० ते १५० सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचे जीवन प्रमाणपत्र भरून देण्यात आले.
टिटवाळा, वासिंद आणि कसारा रेल्वे स्थानकांवर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे ज्येष्ठ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जीवन प्रमाणपत्रासाठी होणारी धावपळ कमी झाल्याने लाभार्थी कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रशासन आणि संघटनेचे आभार मानले.
सेवेत असताना तसेच सेवानिवृत्तीनंतरही कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कॉ. वेणु पी. नायर यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन आणि रेलठेका मजदूर युनियन सातत्याने कार्यरत असल्याचे उपस्थित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला कॉ. नंदू बोंडवे, कॉ. आनंदा भालेराव, कॉ. दिलीप वेंखडे, कॉ. दिलीप शिंदे, कॉ. अशोक सोनावणे, कॉ. गुलाब शिंदे, कॉ. भगवान पंडित यांच्यासह मध्य रेल्वे मुंबई मंडळातील कार्मिक विभागाचे अधिकारी आणि कसारा रेल्वे स्थानकातील कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी कॉ. वेणु पी. नायर जिंदाबाद, एन.आर.एम.यू. जिंदाबाद, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन जिंदाबाद आणि रेलठेका मजदूर युनियन जिंदाबाद अशा घोषणा देत संघटनेच्या कार्याला समर्थन दिले.



Post a Comment
0 Comments