कल्याण | प्रतिनिधी-आनंदा भालेराव
वैजापूर तालुक्यातील काही गावगुंडांकडून भीमसैनिक रोहित पाठारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कल्याण-डोंबिवली महानगर शहर जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणातील पीडित पाठारे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला.
कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून मोर्चाला सुरुवात करून तहसीलदार कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ते पोहोचले. यावेळी रोहित पाठारे यांच्या हत्येचा जाहीर निषेध नोंदवत संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई करून पाठारे कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निषेध आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते आयु. अण्णासाहेब रोकडे, कल्याण-डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष आयु. भीमराव दोंदे, ज्येष्ठ समाजसेवक आयु. रमेश बर्वे, मांडा-टिटवाळा विभाग अध्यक्ष आयु. विजय भोईर, पक्षाचे ज्येष्ठ नेते आयु. बाळासाहेब भालेराव, आयु. दीपक रणधीर यांच्यासह कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील पक्षाचे पुरुष व महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहित पाठारे हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.

Post a Comment
0 Comments