प्रतिनिधी - आनंदा भालेराव
वासिंद : ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन, मुंबई मंडळाच्या वतीने गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वासिंद रेल्वे स्थानकातील स्टेशन प्रबंधक कार्यालयात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी जीवन प्रमाणपत्र भरण्याचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन, मुंबई मंडळाचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. वसंत कासार आणि मुख्यालयाचे सहायक सचिव कॉ. नंदू बोंडवे यांनी भेट दिली. या शिबिरात वासिंद, खडवली आणि आसनगाव विभागातील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी, फॅमिली पेन्शनधारक तसेच दिव्यांग पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र भरण्याचे काम करण्यात आले.
यावेळी कसारा शाखेचे कॉ. पुंडलिक सोलिया, कॉ. दिलीप शिंदे, वासिंद शाखेचे अध्यक्ष कॉ. अनंत लगड आणि मुंबई मंडळाचे सचिव कॉ. आनंदा धोंडीबा भालेराव उपस्थित होते.
विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाच्या वतीने कल्याण-कसारा विभागातील तसेच मुंबई मंडळातील वेल्फेअर अधिकारी उपस्थित राहून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवन प्रमाणपत्र भरून घेण्यासाठी सहकार्य करण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ पेन्शनधारकांना आवश्यक प्रक्रिया स्थानिक पातळीवर पूर्ण करणे सोयीचे झाले.
सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी, कुटुंब पेन्शनधारक आणि दिव्यांग पेन्शनधारकांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरला.
यावेळी कॉ. वेणू पी. नायर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे कर्मचारी संघटनेच्या एकजुटीचा संदेश दिला. कार्यक्रमात 'एनआरएमयू जिंदाबाद' आणि 'ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेअर फेडरेशन जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments