सहसंपादक - शंकर गायकवाड
मंडणगड |भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मंडणगड, सर्व ग्रामशाखा आणि समता सैनिक दल बटालियन मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मंडणगड येथे भव्य बौद्ध धम्म परिषद व बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला धम्मबंधू-भगिनी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. सन २०२७ मध्ये चवदार तळे सत्याग्रह, समता सैनिक दलाची स्थापना आणि बाबासाहेबांच्या जीवनकार्याशी संबंधित महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांना शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगण्यात आले. या ऐतिहासिक घटनांचे सामाजिक परिवर्तनातील योगदान आणि त्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
बाबासाहेबांचे मूळ गाव अंबावडे येथे आयोजित श्रामणेर शिबिर तसेच मंडणगड येथे झालेली भव्य धम्म परिषद या उपक्रमांतून बौद्ध धम्माचा प्रसार, वैचारिक प्रबोधन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
आजच्या तरुण पिढीने आपल्या पूर्वजांनी केलेला संघर्ष, त्याग आणि समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समजून घेणे आवश्यक आहे. केवळ इतिहासाचे स्मरण न करता तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. इतिहासातून प्रेरणा घेऊन समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या धम्म परिषदेसह बौद्धाचार्य व श्रामणेर शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे सैनिक आणि धम्मबंधू-भगिनी यांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments