वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अलीकडे सतत चर्चेत आहेत. त्यांच्या विधानसभेतील वादग्रस्त वक्तव्यांपासून ते विधान परिषदेत ‘रम्मी’ खेळताना पकडल्या गेलेल्या व्हिडीओपर्यंत अनेक प्रकरणांमुळे विरोधकांचा रोष त्यांच्यावर वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मंत्रीपदावर संकटाचे सावट गडद होत चालले आहे.
विरोधकांचा दबाव आणि मंत्रीपदावरचा गडबडीतला डाव
कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतरपासूनच त्यांचे अनेक वादग्रस्त विधानं चर्चेत राहिले. शेतकऱ्यांबाबत केलेले वादग्रस्त भाष्य, पंचनाम्यांच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने आणि आता ‘रम्मी’ खेळताना आलेला व्हिडीओ – या सर्व गोष्टींनी विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यपालांकडे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अधिकृत पत्र पाठवले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ताज्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वादात अडकलेल्या मंत्र्यांना अंतिम इशारा दिल्याची माहिती पुढे आली आहे. कोकाटे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी दत्ता भरणे यांना कृषी मंत्रालय दिले जाऊ शकते, अशी माहिती सध्या मंत्रालयात दबक्या आवाजात फिरत आहे.
रम्मी जागतिक दर्जावर नेणारे मंत्री?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोकाटे यांना उपरोधिक टोला लगावत म्हटले की, “जर कोकाटे क्रीडामंत्री झाले तर ‘रम्मी’ हा खेळ थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल. त्याला जागतिक मान्यता मिळेल.” ही टीका करताना दानवे यांनी कोकाटे यांच्या वर्तनावर सणसणीत बोट ठेवलं आहे.
क्रीडा खाते देण्याची शक्यता
कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खाते बदलण्याचा पर्याय सत्ताधारी विचारात घेत आहेत. कृषी खात्याऐवजी त्यांच्याकडे क्रीडा व युवक सेवा खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Post a Comment
0 Comments