वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शहापूर :- ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात अन्नातून विषबाधा झाल्याने तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तळेपाडा भागातील या घटनेत काव्या (१०), दिव्या (८) आणि गार्गी भेरे (५) या मुलींचा दुर्दैवी अंत झाला.
![]() |
| किन्हवली पोलीस स्टेशन |
सोमवारी, २१ जुलै रोजी या तिघींना अचानक पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्यांची आई त्यांना अस्नोली येथील खासगी डॉक्टरकडे घेऊन गेली. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढे शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तब्येत अधिकच खालावल्यामुळे त्यातील दोन मुलींना मुंबईतील नायर रुग्णालयात तर तिसरीला नाशिक जिल्ह्यातील धामणगावजवळील एसएमबीटी रुग्णालयात हलवण्यात आले.
उपचार सुरू असतानाच काव्या आणि गार्गी यांचा मृत्यू गुरुवारी (२४ जुलै) रात्री झाला, तर दिव्याचा मृत्यू शुक्रवारी (२५ जुलै) सकाळी झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहापूर तालुक्यात शोककळा पसरली असून, गावात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलींच्या नातेवाईकांनी या मृत्यूमागे संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments