.jpg)
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्युज ✍🏻
दि. १८ जुलै २०२५ | जनुना, ता.खामगाव जिल्हा - बुलढाणा.
जनुना गावातील महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार परिसर आज जेवढा स्वच्छ, प्रेरणादायी व सामाजिक उपक्रमांनी समृद्ध आहे, त्यामागे एक निस्वार्थ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व सातत्याने कार्यरत आहे – भारत भगवान शेजव.
कोणत्याही पदाची, पगाराची अपेक्षा न करता समाजासाठी झटणारा एक व्यक्ती..
भारत शेजव हे गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही नोकरी न करता, कोणताही मोबदला न घेता फक्त समाजासाठी आपला वेळ, श्रम आणि संपूर्ण जीवन समर्पित करत आहेत. त्यांनी लहान वयापासूनच समाजसेवेची दिशा निवडली आणि आजही तीच निष्ठा जपत आहेत.
दररोज महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार परिसरात सकाळी लवकर उठून ते स्वच्छतेचे काम करतात. विहार झाडणे, परिसरातील झाडांना पाणी घालणे, पावसात-ऊनात नियमित उपस्थित राहणे, यामध्ये त्यांचा खंड नाही. विशेष म्हणजे ही सर्व कामे ते कोणतीही अपेक्षा न ठेवता, निस्वार्थ भावनेने करतात.
पंचशील नवयुग क्रीडा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या ट्युशन क्लासमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग
गावातील गरीब आणि वंचित मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत ट्युशन क्लासमध्ये भारत शेजव यांचा विशेष सहभाग आहे. शेख राजिक सर, शुद्धधन दुर्योधन शेजव सर, आचल मॅडम यांच्यासोबत भारत शेजव रोज मुलांच्या शैक्षणिक व मानसिक विकासासाठी कार्य करतात.
विद्यार्थ्यांना मोफत पेन, पेन्सिल, वह्या, चॉकलेट यांचे वाटप करण्याची जबाबदारी भारत शेजव स्वतःहून घेतात. इतकंच नाही तर गावाबाहेर असणारे समाजबांधव त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच घेतात.
संस्कार, स्टेज डेअरिंग व सामाजिक बांधिलकीचा पाठ
ट्युशन क्लासमध्ये मुलांना रोज 'हिंसा करणार नाही', 'चोरी करणार नाही', 'खोटं बोलणार नाही', 'स्त्रीला आईसमान मानेन', 'दारू पिणार नाही' अशा शपथा दिल्या जातात. मुलांना स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी दोन शब्द बोलायला लावले जाते. हे सर्व उपक्रम भारत शेजव यांच्या प्रेरणेने आणि सहभागानेच शक्य झाले आहेत.
आपल्या पैशातून लावतात मेणबत्त्या, अगरबत्त्या आणि स्वच्छता साहित्य.
संविधान चौक व बुद्ध विहार परिसरात लागणाऱ्या मेणबत्त्या, अगरबत्त्या, स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य हे सर्व भारत शेजव स्वतः विकत घेतात. त्यांच्या कार्यातील सातत्य, समर्पण आणि सामाजिक जाणीव फारच वेगळी व उल्लेखनीय आहे.
ग्रंथपठण ऐकणे व वैचारिक जागरूकता.
भारत शेजव हे दररोज ग्रंथवाचन होत असताना ऐकतात . डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची त्यांना सखोल जाणीव आहे. त्यांनी कधीही औपचारिक शिक्षण घेतले नसले, तरी त्यांचे आचरण हे विचारांनी परिपोषित आहे.
गावकऱ्यांचा गौरव सोहळा
गावातील ट्युशन क्लास चालक, पंचशील मंडळ, आणि समस्त ग्रामस्थांनी भारत शेजव यांचा सार्वजनिक गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजासाठी, मुलांसाठी, स्वच्छतेसाठी आणि विचार जागृतीसाठी त्यांनी दिलेलं योगदान अपूर्व आहे. त्यांच्या प्रेरणेने आज जनुना गावात एक सकारात्मक आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण झालं आहे.
समारोप
आजच्या स्पर्धात्मक, व्यक्तिकेंद्री जगात भारत शेजव यांच्यासारख्या निस्वार्थ व्यक्तिमत्त्वाकडे बघणं म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवतेची ओळख करून घेणं होय. त्यांचं कार्य संपूर्ण समाजासाठी एक दीपस्तंभ आहे.





Post a Comment
0 Comments