वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज! रितेश साबळे .
मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) च्या धोरणांविरोधात आणि पुनर्वसन प्रकल्पातील विलंबामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात “आपल्या हक्काच्या घरासाठी – आपला लढा अधिक तीव्र करूया” या घोषवाक्याखाली जन-आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा बुधवार, 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:00 वाजता अनंत कानेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई येथील SRA कार्यालयावर धडकणार आहे.
मोर्चाचे उद्दिष्ट झोपडपट्टीतील नागरिकांना पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणणे हे आहे. आयोजकांच्या मते, SRA कडून दाखवण्यात आलेल्या पुनर्वसन योजनांमध्ये विलंब, प्रक्रिया रखडणे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष यामुळे हजारो कुटुंबांचे हाल होत आहेत. त्यामुळे या लढ्याला आणखी तीव्रता देत मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत.
या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे समर्थन असून, पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून लोकांना आवाहन केले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X (ट्विटर) सारख्या माध्यमांवर या आंदोलनाचा प्रचार सुरू असून, नागरिकांना मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या घोषणेत “झोपडीतून पक्क्या घराचे स्वप्न” हा मुख्य संदेश असून, हा मोर्चा केवळ पुनर्वसनासाठीच नव्हे तर नागरी हक्कांसाठी देखील लढणारा आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आयोजकांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments