Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

भारतीय स्वातंत्र्य दिन, महा.अंनिस 36 वा वर्धापन दिन आणि अण्णाभाऊ साठे जयंती कल्याण येथे उत्साहात साजरी.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

गणेश आहिरे 

 कल्याण (ता. 15 ऑगस्ट) – रेल्वे ऑफिसर्स क्लब हॉल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा कल्याण आणि सोबती सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 36 वा वर्धापन दिन आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


या कार्यक्रमाला इतिहास अभ्यासक प्रा. संदीप कदम, महा.अंनिसच्या राज्य सरचिटणीस (कोकण विभाग) आरती नाईक हे प्रमुख पाहुणे तर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. सोबती सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष सोनवणे व खजिनदार मोहन साठे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.


प्रा. कदम यांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊ साठेंचा जीवनसंघर्ष, मराठी साहित्य व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान यावर प्रकाश टाकला. आरती नाईक यांनी महा.अंनिसच्या 36 वर्षांच्या कार्याचा आढावा घेत वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बसवंत यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे साधेपण व कार्यकर्त्यांवरील विश्वास यांचा उल्लेख करून स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.


कार्यक्रमात भाग्यश्री भडांगे यांनी परिवर्तन गीते, मंगल मोरे यांनी अण्णाभाऊ साठेंची छक्कड, तर शरद लोखंडे यांनी वामनदादा कर्डक यांचे गीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


या सोहळ्याला आयटकचे उदय चौधरी, समता संघर्ष संघटनेचे शैलेश दोंदे, स्त्रीमुक्ती संघटनेच्या संगीता जोशी, राष्ट्रसेवा दलाचे सुहास कोते, संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश कांबळे तसेच महा.अंनिस व सोबती सामाजिक विकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. आरती हटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन शरद लोखंडे व मंगल मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुरेश कापरे, नितीन वानखेडे, अविनाश दोंदे व हनुमंत देडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments