वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शेख हसन
खामगाव तालुक्यातील बोथाकाजी (जि. बुलढाणा) येथील गुलाब चंद्रभान घटे (वय 21) हा तरुण आपल्या मित्रांसोबत मासेमारी करण्यासाठी कंचनपूर परिसरातील नदीवर गेला होता. दरम्यान, मासेमारी सुरू असताना तो पाण्यात उतरला. मात्र दुर्दैवाने पाण्याजवळ असलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसल्याने गुलाब याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. 30 ऑगस्ट) संध्याकाळी अंदाजे 4.30 वाजताच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत गुलाबने प्राण सोडले होते. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली. तरूण वयातच झालेल्या या मृत्यूने बोथाकाजी गावातील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.
गुलाब हा स्वभावाने मनमिळावू आणि मेहनती होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे घटे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, गुलाब घटे यांच्यावर रविवारी (ता. 31 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता बोथाकाजी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून "नदीकाठी सुरक्षेची काळजी घेण्याची गरज" असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

Post a Comment
0 Comments