Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

शहापूर तालुक्यात पूरस्थिती गंभीर; शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण.


 वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

शंकर गायकवाड

किन्हवली – शहापूर तालुक्यात सलग तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत असून शेतकरी वर्ग सर्वाधिक धास्तावला आहे. तुडुंब पाण्याने भरलेल्या शेतांमध्ये उभे असलेले भातपिक कुजण्याच्या मार्गावर आहे.


भातसा धरणाचे पाचही दरवाजे तर तानस धरणाचे तब्बल ३८ दरवाजे उघडण्यात आल्याने सापगाव, सारंगपुरी, वासिंद, सावरोली, अघई परिसरातील नागरिकांना पूरस्थितीची झळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी प्रशासनासह परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.


किन्हवली परिसरातही वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सोगाव रोडवरील बर्डेपाडा पुलाजवळील रस्ता पाण्याखाली गेल्याने काही काळ किन्हवली–सोगाव मार्ग बंद ठेवावा लागला. आंबेखोर रस्त्यावरही पाणी शिरल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.


दरम्यान, टाकीपठार, सोगाव, सावरोली (सो), चिखलगाव, अल्याणी, कानवे, मानेखिंड परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. संततधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने नागली व भातरोपांना कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. शाई–काळू नदीला आलेल्या पुरामुळे किनाऱ्यावरील शेती पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर कानवी, नानी, चोर यांसारख्या नद्या तसेच ओढे–नाले दुथडी भरून वाहत आहेत.


सततच्या पावसामुळे मंगळवार व बुधवार हे दोन दिवस तालुक्यातील सर्व शाळा–महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण बाजारपेठाही ठप्प असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने प्रशासन पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.



Post a Comment

0 Comments