Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

विद्यार्थ्याला वाचवताना शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू – वेरूळ लेणी परिसरात हृदयद्रावक घटना

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

छत्रपती संभाजीनगर : (संपादकिय )

रविवारी वेरूळ लेणी परिसरातील जोगेश्वरी कुंडात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण संभाजीनगर जिल्हा शोकमग्न झाला आहे. खाजगी क्लासेसचे नऊ विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेले असता हा अपघात घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, विटखेडा येथील खाजगी क्लासेसचे शिक्षक राजवर्धन अशोक वानखेडे (वय 29, रा. चिखली, बुलढाणा; ह.मु. विटखेडा) हे त्यांच्या 9 विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बसमधून वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेले होते. लेणी पाहून झाल्यानंतर ते डोंगरावरील जोगेश्वरी कुंडाजवळ गेले. तेथे उभा असताना विद्यार्थी चेतन संजय पगडे (वय 17, रा. बिल्डा, ता. फुलंब्री; ह.मु. विटखेडा) याचा पाय घसरला आणि तो थेट कुंडात पडला.


ही बाब शिक्षक वानखेडे यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत कोणताही विलंब न करता कुंडात उडी घेतली. विद्यार्थ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पाण्यात बुडणाऱ्या चेतनने भीतीपोटी शिक्षकांना घट्ट मिठी मारली. त्यामुळे दोघेही पाण्याच्या खोलीत अडकून गेले आणि बाहेर येऊ शकले नाहीत.


दरम्यान, कुंडाच्या आसपास गुरे चारत असलेल्या गुराख्यांना ही घटना दिसली. त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत दोघांना बाहेर काढले. लगेचच रुग्णवाहिकेद्वारे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.


या घटनेमुळे वेरूळ परिसरात आणि विटखेडा गावात शोककळा पसरली आहे. विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणाऱ्या शिक्षक राजवर्धन वानखेडे यांच्या धाडसाला सर्वत्र नतमस्तक आदर व्यक्त होत आहे. मात्र गुरू-शिष्य दोघांच्याही निधनाने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




Post a Comment

0 Comments