मनोहर गायकवाड
मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. हे आंदोलन २९ ऑगस्ट २०२५ रोजी आझाद मैदानात होणार असून, पोलिसांनी परवानगीसोबत पाच अटी-शर्ती लावल्या आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती.
मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना बेमुदत उपोषण व आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. मात्र बुधवारी मुंबई पोलिसांनी केवळ एका दिवसासाठी आंदोलनास हिरवा कंदील दाखवला.
प्रमुख अटी-शर्ती :
स्थळ व वेळ : आंदोलन आझाद मैदानातील राखीव जागेतच करायचे असून, सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेतच परवानगी असेल.
आंदोलक संख्या : कमाल ५,००० आंदोलकांना प्रवेश दिला जाईल.
वाहतूक व्यवस्था : आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्री वे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंतच येतील. फक्त ५ वाहने आझाद मैदानापर्यंत नेण्यास मुभा असेल. उर्वरित वाहने पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार शिवडी, ए-शेड आणि कॉटनग्रीन परिसरात पार्क करावी लागतील.
ध्वनी व स्वच्छता : परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वापरता येणार नाही. अन्न शिजवणे किंवा कचरा टाकणे सक्त मनाई असेल.
विशेष सूचना : आंदोलन शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी घेता येणार नाही. तसेच लहान मुले, गर्भवती स्त्रिया व वृद्धांना सहभागी करू नये.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन जाहीर केले आहे.


Post a Comment
0 Comments