Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुंबईचा डॅडी अरुण गवळी १७ वर्षांनंतर बाहेर येणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय..



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

मनोहर गायकवाड 

मुंबई -गँगस्टर अरुण गवळी या सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अरुण गवळीच्या दीर्घ कारावासाची नोंद घेतल्यानंतर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.


 मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी 2007 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

'१७ वर्षांपेक्षा जास्त काळ अरुण गवळी तुरुंगात होता आणि अपील प्रलंबित होतं. त्याचं वयही ७६ वर्षांपेक्षा जास्त आहे, हेदेखील आम्ही लक्षात घेत आहोत,' असं न्यायमूर्ती एम.सुंदरेश आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने नमूद केले.


सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने लादलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून अरुण गवळीचा जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठेवले. अरुण गवळीला कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, ज्याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिलं, पण उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला, त्यानंतर अरुण गवळीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

मुंबईच्या दगडी चाळीतून साम्राज्य चालवणाऱ्या अरुण गवळीने नंतर राजकारणात एन्ट्री घेतली आणि अखील भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली. २००४ ते २००९ या कालावधीमध्ये अरुण गवळी मुंबईच्या चिंचपोकळी मतदारसंघातून आमदार होता. पण २००६ साली अरुण गवळीला कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आली, यानंतर ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने त्याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि १६ लाख रुपयांचा दंड ठोठावला.



Post a Comment

0 Comments