वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
पुणे-सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती आणि पत्नीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचा शोध आता आरोग्य विभागासह राज्य अवयव प्रत्यारोपण सल्लागार समिती घेणार आहे. सह्याद्री रुग्णालयाने सोमवारी आरोग्य विभागाला अहवाल सादर केला. या अहवालाची तपासणी करून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, महापालिका आरोग्य विभागानेही सह्याद्री रुग्णालयाला नोटीस बजावली असून, २४ तासांत अहवालासह डॉक्टरांचा खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय झालं?
बापू बाळकृष्ण कोमकर यांना यकृताचा आजार झाला होता. त्यांच्यावर डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात १३ ऑगस्ट रोजी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. कोमकर यांना त्यांच्या पत्नी कामिनी कोमकर यांनी यकृताचा काही भाग दिला होता. मात्र, शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी १५ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी कामिनी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला
या प्रकरणाची दखल घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने सह्याद्री रुग्णालयाला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रुग्णालयाने सोमवारी आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाला अहवाल सादर केला. मात्र, कागदपत्रांची संख्या जास्त असल्याने सोमवारी या प्रकारणाची चौकशी पूर्ण झाली नाही. संपूर्ण कागदपत्रांचा अभ्यास करून येत्या दोन दिवसांमध्ये कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले; तसेच आज (मंगळवार २६ ऑगस्ट) रोजी राज्य आरोग्य विभाग आणि राज्य अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्येही या प्रकरणाची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सह्याद्री रुग्णालय म्हणते...
आरोग्य उपसंचालकांकडून मिळालेल्या सूचनेनुसार अहवाल सादर केला आहे. त्यांनी काही अतिरिक्त माहितीदेखील मागितली आहे, ती माहिती सादर करण्यात येणार असल्याचे निवेदन सह्याद्री रुग्णालयाने सोमवारी प्रसिद्ध केले. शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीची कल्पना नातेवाइकांना दिली होती, असेही रुग्णालयाने सांगितले.


Post a Comment
0 Comments