वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
ठाणे- डोंबिवली जवळील सागाव परिसरात असलेल्या चंदन ज्वेलर्सच्या कंपनीच्या बाजूने असलेल्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी लाखोचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितलं.
शहरात चैनसाखळी चोरीं, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून चोरट्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे सर्वत्र विणले गेले असले तरी चोरट्यांना सीसीटीव्हीचे देखील भय उरलेले नसल्याचे दिसत आहे. डोंबिवली जवळील सागाव परिसरात असलेल्या चंदन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात सोन्याचे दागिने आर्कषक पद्धतीने मांडून ठेवल्याची रेकी करत चोरट्यांनी शुक्रवारी रात्री या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या बंद पडलेल्या कंपनीच्या बाजूने भिंतीला भगदाड पाडले. मजबूत बांधकाम असलेल्या या भिंतीत असलेल्या खिडकीचे लोखंडी बार गॅस कटरच्या मदतीने कापून काढत मजबूत भिंत तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
यानंतर दुकानात असलेले जवळपास ५ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच मालकाचे डोळे विस्फारले. भिंतीला भगदाड पाडून आत शिरलेला चोरटा कॅमेऱ्यात कैद झाल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजसह डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून या चोरट्याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.


Post a Comment
0 Comments