वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे .
जोगेश्वरी (वाळूज) – जोगेश्वरी वाळूज परिसरात रात्री चार वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर पहाटे 10 वाजेपर्यंत कायम होता. या सततच्या पावसामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. कामगारांना कारखान्यांमध्ये जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दरम्यान, 15 ऑगस्ट निमित्त जोगेश्वरीतील अनेक शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकवर्गाने नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनासाठी विशेष नृत्य सराव केला होता, तर शिक्षकांनी कार्यक्रमाचे बारकाईने नियोजन केले होते. परंतु, पावसामुळे नियोजित कार्यक्रम राबवता आला नाही. परिणामी, केवळ ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायले गेले आणि कार्यक्रमाला आटोपता घेण्यात आला.
पावसामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखल व पाणी साचल्याने वाहनांची हालचाल मंदावली. स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे जलनिस्सारणाची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी केली असून, पावसाचा जोर आणखी वाढल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




Post a Comment
0 Comments