Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, जनुना येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


 वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज!!

कार्यकारी संपादक : रितेश साबळे 

(खामगाव) दिनांक – 15 ऑगस्ट 2025 – भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त खामगाव पंचायत समिती अंतर्गत जनुना येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी गजानन शिरस्कार तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कर्नल परमशिव अनंतराव शेजव, संतोष मोहन साबळे आणि रूपाली साबळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी कर्नल परमशिव शेजव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची कवायत आणि लेझीमचे सादरीकरण झाले.



यानंतर गावातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी, विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी, रांगोळी व चित्रकला स्पर्धेतील विजेते, अंगणवाडी सेविका, तसेच गावातील विविध क्षेत्रात सेवा देणारे नागरिक यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. स्वयंप्रेरणेने गावात मोफत शिकवणी वर्ग घेणारे रजिक भाई व शुद्धोधन शेजव यांनाही विशेष सत्काराने गौरविण्यात आले.


कर्नल परमशिव शेजव यांनी गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, तसेच निस्वार्थ सेवा करणाऱ्या गावकऱ्यांना विविध भेटवस्तू देऊन सन्मानित केले. कार्यक्रमात कर्नल शेजव, संतोष साबळे आणि हाजी इब्राहिम खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी शाळेसाठी 3,641 रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली.


गावातील प्रभात फेरी, लेझीम आणि कवायत हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिंदे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. बगाडे सर यांनी केले. गावातील प्रतिष्ठित नागरिक हाजी इब्राहिम खान पठाण यांनी 50 किलो बुंदीचे वाटप खाऊ स्वरूपात केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप भाऊ गोरे, अमोल गोरे, अमोल गव्हांदे, राजुभाऊ खंडेराव, पंचशील क्रीडा मंडळ आणि गावातील सर्व युवकांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक, स्वातंत्र्यप्रेमी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, महिला मंडळी, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, कृषी सहाय्यक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घुगे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.


अशा उत्साही वातावरणात विविध कार्यक्रमांनी जनुना गावात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा यशस्वीपणे पार पडला.



Post a Comment

0 Comments