वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
ठाणे :- जिल्हाधिकारी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत ॲट्रॉसिटी कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदी, तपासातील त्रुटी, पुराव्यांचे व्यवस्थापन आणि दोषारोपपत्राची गुणवत्ता यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभवजी गिते यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना गुन्ह्याच्या तपासाची बारकाईने माहिती दिली. फिर्याद, साक्षी, पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया यावर भर देत दोषींपर्यंत पोहोचण्यासाठी काय योग्य पावले उचलावीत, हे त्यांनी दाखवून दिले. विशेषतः ठाणे जिल्ह्यातील काही खून प्रकरणांचे उदाहरण देऊन दोषारोपपत्रातील त्रुटींवर प्रकाश टाकला.
कार्यशाळेच्या प्रास्ताविक भाषणात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित केली. तर निरीक्षक अभिजीत शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रभावीपणे पार पाडले. यावेळी ऍड. राहुल गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी कायदा व त्याचे नियम सविस्तरपणे समजावून सांगितले.
कार्यशाळेमध्ये सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
![]() |
| वैभवजी गिते |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे महासंचालक सुनील वारे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अशा कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात झालेली ही कार्यशाळा अत्यंत सकारात्मक ठरली. जिल्ह्यातील चार खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी देण्यात आलेल्या पीडितांच्या पुनर्वसनाची चर्चा करण्यात आली. उर्वरित पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी वैभवजी गिते यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे आणि निरीक्षक अभिजीत शिंदे यांचे विशेष योगदान राहिले. यावेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे मुंबई ठाणे प्रदेशाध्यक्ष बंदिशजी सोनवणे, सचिव शशिकांतजी खंडागळे, भाऊराव तायडे, ऍड. जाधव, दीपक भालेराव व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ही माहिती NDMJ ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव यांनी दिली.





Post a Comment
0 Comments