वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
संपादकीय
आमदारांच्या घरासमोरच रस्त्यांची दयनीय अवस्था; नागरिक संतप्त.
कल्याण-डोंबिवली : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या निवासस्थानासमोरील रस्ता देखील उखडलेला असून, त्यामुळे ‘आमदारांच्या भागात अशी परिस्थिती असेल तर बाकी शहराचे काय?’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
महापालिकेच्या हद्दीत तब्बल 420 किमी लांबीचे रस्ते आहेत. यापैकी केवळ 20 टक्के रस्ते काँक्रीटचे असून उर्वरित सर्व डांबरी रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. या वर्षीच्या पावसामुळे डांबराचे रस्ते उखडले आणि सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. परिणामी, वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान तसेच प्रवाशांना पाठदुखीचे त्रास उद्भवत आहेत.
महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचा इशारा दिला होता. मात्र तो हवेतच विरल्याचे स्पष्ट होत आहे. खड्डे बुजवण्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनसुद्धा रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. “खड्डे बुजवायला काढलेला निधी खड्ड्यातच गेला की काय?” अशा संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनीही प्रशासनावर सडकून टीका केली आहे. “गणपती बाप्पांचे आगमन खड्ड्यांमधून झाले. आता विसर्जनाआधी तरी रस्त्यांची डागडुजी करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments