वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
👉 *२८ धारदार चाकू, कोयता, मिरची पूडसह आखला दरोड्याचा प्लॅन; पोलीस पाटलाने टीप दिली अन् झाले जेरबंद*
*नाशिक-* दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे २८ चाकू, कोयता, मिरचीपूड, दोरी असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पळसे गावातील पोलीसपाटील सुनील गायधनी यांनी डायल 112 वर कॉल करून गावात काही संशयित चोर फिरत असल्याची माहिती दिली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना कळविण्यात आली. त्यानुसार त्यांनी आदेश दिल्यानंतर गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेताजवळ संशयित व्यक्तींचा शोध घेत असताना पाच जण पळून जाताना दिसले. पोलिसांनी पाठलाग करत रविकुमार भोई (27, रा. मराठी मंदिर झोपडपट्टी, अंबरनाथ, जि. ठाणे), शिवा विक्रम वैदू (36, रा. आनंदनगर, जळगाव), विष्णू शंकर भोई (30, रा. टायगर गाव, कल्याण फाटा, जि. ठाणे), आकाश गोपाळ वैदू (38, रा. पाण्याच्या टाकीजवळ, पाचोरा, जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले.
त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई (रा. आसवनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक) अंधाराचा फायदा घेत पळून गेला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 28 धारदार चाकू, एक कोयता, मिरचीपूड व दोरी असा दरोड्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे सर्व आरोपी संभाव्य दरोड्याच्या तयारीत असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तपास करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सपोनि प्रवीण सूर्यवंशी, सपोनि किरण कोरडे, उनि संदीप पवार, हवालदार अविनाश देवरे, विशाल पाटील, पोशि नितीन भामरे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, विशाल कुवर, समाधान वाजे, धीरज बिडकर, चापोशि योगेश रानडे व निखिल कुन्हे यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments