Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

उपक्रमांचा खजिना म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेची शेलवली बांगर शाळा

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

किन्हवली (शंकर गायकवाड) :

केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आवश्यक आहे. या ध्येयाने कार्यरत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या शेलवली बांगर शाळेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात लौकिक मिळवला आहे. परिणामी शाळेच्या पटात विक्रमी वाढ झाली असून 134 वरून तो थेट 197 वर पोहोचला आहे.


या शाळेतील प्रश्नमंजुषा हा विशेष उपक्रम ठरला असून त्यातून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची भक्कम तयारी होत आहे. यंदा शाळेतील तब्बल 11 विद्यार्थी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत तर 9 विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती आणि 10 विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. याशिवाय 3 विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.


फक्त शैक्षणिकच नव्हे तर विज्ञान क्षेत्रातही शाळेने यश मिळवले असून, ठाणे जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी पात्र ठरली आहे.


शाळेच्या उपक्रमांची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत. सत्यसाई सेवा संस्थेने शाळेसाठी सुसज्ज अशी नवी इमारत उभारली असून, इतर संस्थांनी शाळेच्या भौतिक गरजांची पूर्तता केली आहे. याशिवाय गावातील पालक आपल्या पाल्यांचे वाढदिवस शाळेत साजरे करून शाळेला भरघोस मदत करीत आहेत.


दरवर्षी आयोजित दोन दिवसीय शिक्षण महोत्सवात संपूर्ण गाव उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून शिक्षणाचा खरा उत्सव साजरा करीत आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शिक्षक व अधिकारी या शाळेला भेट देऊन उपक्रमांचे कौतुक करीत आहेत.


शेलवली बांगर शाळेने केलेले हे प्रयत्न ‘शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून गावाच्या प्रगतीचा केंद्रबिंदूही ठरू शकते’ याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.





Post a Comment

0 Comments