Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सिव्हिल हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे शीतल मोरे यांचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीचे जाहीर निदर्शने



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे वंचित बहुजन युवक आघाडी नाशिक तालुका अध्यक्ष विकी वाकळे यांची भगिनी शीतल निलेश मोरे हिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.


२ जानेवारी २०२५ रोजी शीतल मोरे यांना प्रसूतीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सिझर शस्त्रक्रियेनंतर तीव्र पोटदुखी होत असल्याची तक्रार त्यांनी वारंवार केली. मात्र, ड्युटीवरील डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांनी कोणतीही मदत न करता मोबाईलमध्ये गुंग राहिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. अखेरीस उपचाराअभावी शीतल मोरे यांचा मृत्यू झाला.


मृत्यूनंतर देखील हॉस्पिटल प्रशासनाने अमानुष वर्तन करत पोस्टमार्टमची सुविधा उपलब्ध असतानाही मृतदेह धुळ्याला घेऊन जाण्यास सांगितले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नाशिक सिव्हिल प्रशासनाविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे.


या घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडी, नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते व इतर संघटनांनी उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली होती. आरोग्य विभागाने चौकशीदरम्यान हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची नोंद घेतली व सरकारवाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र, पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई न केल्याने संताप वाढला आहे.


त्यामुळे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. या निदर्शनात वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन व भारतीय बौद्ध महासभा नाशिक या संघटना सहभागी होणार आहेत.


संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून शीतल मोरे यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments