वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
रितेश साबळे .
छत्रपती संभाजीनगर : दिः22 रोजी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि वाहतूक विभागाने एकत्रितपणे विशेष “नो पार्किंग” मोहीम राबवली. या मोहिमेत शहरातील विविध भागांमध्ये नो पार्किंग झोन मध्ये उभी असलेली तब्बल ३ हजार वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईतून प्रशासनाने जवळपास २२ लाख रुपये दंड वसूल केला आहे.
दररोज वाढत्या वाहनसंख्येमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी गंभीर समस्या बनली आहे. यामुळे नागरिकांना प्रवासात त्रास सहन करावा लागत होता. विशेषत: रुग्णवाहिका, शालेय बस आणि आपत्कालीन वाहने यांना वारंवार अडथळे निर्माण होत होते.
![]() |
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक पावले उचलत मोहिम हाती घेतली. शहरातील उस्मानपूरा, गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही सेंटर परिसरासह गजबजलेल्या चौकात ही मोहीम राबवण्यात आली. कारवाईदरम्यान अवैधरित्या उभी असलेली दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू गाड्या उचलण्यात आल्या.
वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मोहीम पुढील काही दिवसही सुरू राहणार असून नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “वाहतूक शिस्तीचे पालन सर्वांच्या हिताचे असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील,” असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे काही वाहनचालक संताप व्यक्त करत असले तरी बहुतांश नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. वाहतूक शिस्त आणि रस्त्यावरील सुरळीतता यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



Post a Comment
0 Comments