वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
ठाणे जिल्हा प्रतिनिधी : मनोहरजी गायकवाड
ठाणे – मुरबाड बस आगाराच्या मनमानी व भोंगळ कारभाराविरोधात आज मुरबाड तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत आर.पी.आय. (सेक्युलर) कार्यकर्त्यांनी आगारप्रमुख योगेश मुसळे यांना चांगलेच धारेवर धरले. प्रवाशांशी उद्धट वागणे, बस वेळेवर न सोडणे, फेऱ्या रद्द करणे यांसह इतर गैरसोयीबाबत मुसळे यांची कार्यकर्ते आणि पत्रकारांनीही खरडपट्टी काढली.
ही बैठक आर.पी.आय. सेक्युलर ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या वतीने नायब तहसीलदार सुषमा बांगर, तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिन धनगर, अविनाश रातांबे, रामचंद्र टंटोले आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रवाशांशी उद्धट वर्तणूक, गळक्या व भंगार बस, लांब पल्ल्याच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना न घेणे, बस फेऱ्या रद्द करून डिझेलचा अपहार, कार्यशाळेतील साहित्य भंगारमध्ये विकणे, खोटी दुरुस्ती बिले सादर करून शासकीय निधीचा अपहार, तसेच मुरबाड-कल्याण बसफेऱ्या कमी करून खासगी वाहतुकीला खतपाणी घालणे अशा गंभीर आरोपांवर खडाजंगी चर्चा झाली.
यावेळी नायब तहसीलदार बांगर यांनी आगारप्रमुख मुसळे यांना कारभार तातडीने सुधारण्याची सक्त ताकीद दिली. तसेच पुढील आठ दिवसांत विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती रवींद्र चंदने यांनी दिली.
एकूणच मुरबाड बस आगाराच्या कारभारामुळे प्रवासी, विद्यार्थी व कामगार वर्ग त्रस्त झाला असून तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे. "आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आमच्या पद्धतीने होईल," असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी दिला.



Post a Comment
0 Comments