वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
प्रतिनिधी:-मोहनजी दिपके.
हिंगोली – एकच मिशन एस.टी. आरक्षण! या घोषणांनी आज औंढा नागनाथ – जिंतूर – नांदेड टी पॉइंट रोड दणाणून गेला. हिंगोली जिल्ह्यात सकल बंजारा समाजाच्या वतीने जवळजवळ दोन तास भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हजारोच्या संख्येने महिला, पुरुष व युवक सहभागी झाले होते.
बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटरनुसार आपली नोंद एस.टी. प्रवर्गात असल्याने त्याच प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी केली. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा जीआर काढला आहे, त्याचाच आधार घेत बंजारा समाजालाही न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनादरम्यान औंढा नागनाथ येथील मा. तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. समाजातील नेत्यांनी स्पष्ट केले की, ही लढाई आता राज्यव्यापी होणार असून लवकरच आझाद मैदान, मुंबई येथे मोठे आंदोलन छेडले जाणार आहे.
रस्ता रोकोमुळे टी पॉईंटवर लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आंदोलन संपल्यानंतर जवळपास एक तास वाहतूक सुरळीत होण्यासाठी लागला.



Post a Comment
0 Comments