वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मनोहर गायकवाड
कल्याण – गेल्या दीड वर्षांपासून कल्याणमध्ये मराठी व परप्रांतीयांमधील बोली भाषेचा वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. याच वादाला पुन्हा उधाण आणणारी धक्कादायक घटना कल्याण पश्चिम येथील ‘पटेल आर मार्ट’मध्ये घडली आहे. येथे एका महिला कर्मचाऱ्याने ज्येष्ठ नागरिकाशी अरेरावी केल्याची घटना समोर आली असून, तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ज्येष्ठ माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर वस्तू खरेदीसाठी टिळक चौकातील पटेल आर मार्टमध्ये गेले होते. खरेदी करताना त्यांनी मार्टमधील महिला कर्मचाऱ्याला वस्तू देण्याची मागणी केली असता, ती तरुणी हिंदीतून बोलू लागली. त्यावर घाणेकर यांनी तिला “तुम्हाला मराठी येत नाही का?” असा प्रश्न विचारला. त्यावर त्या तरुणीने संतापाने “मराठी बोलण्याची सक्ती आहे का? नाही आली तर काय फरक पडतो?” असे उलट उत्तर दिले आणि हात आदळआपट करत अरेरावी केली.
या प्रकाराची माहिती घाणेकर यांनी तात्काळ दुकान व्यवस्थापक मनीषा धस यांना दिली. यावेळी घाणेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या तरुणीने “मी गेली चार वर्षे महाराष्ट्रात राहते” असे उत्तर दिले. यावर व्यवस्थापक धस यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील आणि आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले.
घाणेकर यांनी इशारा दिला की, “महिनाभरात या दुकानातील प्रत्येक कर्मचारी मराठीतच संवाद साधला पाहिजे. अन्यथा नागरिकांना येथे खरेदी करू नका, असे आवाहन आम्ही करू.”
या घटनेमुळे कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय या विषयावरून चर्चा रंगू लागली आहे.

Post a Comment
0 Comments