वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शहापूर ,:-शंकर गायकवाड
शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या मूलभूत हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज मोठ्या प्रमाणावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण आणि इतर शासकीय सुविधा न मिळाल्याने नाराज असलेल्या आदिवासी समाजाने प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला.
शहापूर तालुका हा आदिवासी बहुल असूनही अनेक दुर्गम खेड्यांमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित असल्याचे मोर्चेकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत योग्य पावले उचलून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या आक्रोश मोर्चात तालुक्यातील विविध खेड्यांमधून महिलांसह तरुण आणि ज्येष्ठ आदिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयावर एकाचवेळी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी “आमचे हक्क द्या”, “आरोग्य सेवा हवी”, “शिक्षणाची सुविधा द्या” अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.
संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चाने शिस्तबद्धपणे आपले मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. पुढील काळात प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून आदिवासी समाजाच्या समस्यांवर तोडगा काढावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.


Post a Comment
0 Comments